।। श्रीनाथ समर्थ ।।

परम पूजनीय श्रीमनोहरनाथ महाराजांचे साहित्य

स्फूट पदेः १५००
अभंगः ५००
आख्यानेः
विविध स्तोत्रे- आरत्या
श्रीनाथ दैनंदिनी - सांप्रदायिक नित्यक्रम
नाथ फकिर - श्रीदेवनाथ महाराजांचे गद्य चरित्र
सन्मार्ग शतपाऊली - निवडक सुविचार संग्रह व सांप्रदायिक नित्यपाठ
श्रीनाथ सद्भाव संवत्सरी -
दिन महात्म्य अर्थात वर्षातील प्रत्येक दिवसाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व (अप्रकाशित)
गीत श्रीदेवनाथ चरित्र - (अप्रकाशित)
श्रीदेवनाथ लीलालहरी -
श्रीदेवनाथ महाराजांचे ओविबध्द चरित्र व सांप्रदायिक पारायण ग्रंथ

नाथा गणराया वंदू या । नाथा गणराया ।।धृ.।।
विघ्नविनाशक भक्ता तारक । दुष्टजनांचा तू संहारक ।
बुद्धिदाता तू सुखदायक । रंगी भक्तिचे रंगवी राया ।।१।।
तालस्वर ना भाव न जाणिव । परी कृपातव अगाध अभिनव ।
रसरंगी गुंगवी मन तन्मय । मोदे जीवा डोलवी या ।।२।।
धाव वेगी ये ये गणदेवा । भजनी विखरूं दे भाव गोडवा ।
गोविन्दनाथ घेई कनवा । 'मनोहरा' वरी शांती चिन्मया ।।३।।
..............................................
गोड तुझे नाम, हरी पतितपावना ।।धृ.।।
विपुल विभव देत नाम । दुष्कर्मा करूनी भस्म ।
पूर्ण करी सर्वकाम । नाम साधना ।।१।।
नरजन्मा सार्थ करी । नाम चित्त शुद्ध करी ।
वाल्मिकीस उलट जप ही । दावि सुखघना ।।२।।
पापी अजामिळ पहा । शुकपक्षी गज पशू हा ।
नामाचा महिमा हा । पापवारणा ।।३।।
पूर्वजन्म पुण्याई । भजनी गोडी ही हृदयी ।
'मनोहरनाथ' गोविन्द गोविन्द । गाई नित गुणा ।।४।।
..............................................
नारायण हृषीकेशी अनंता । श्रीपती कमलाकान्ता ।
विकळ विस्कळीत जीवित गाथा । तुजविन सद्गुरूनाथा ।।धृ.।।
बघत वाटुली काळ चालला । धीर नुरे चित्ता ।
मळीन मन विषयी जाळीत तनु । सोशित षड्रिपू घाता ।।१।।
धीर धरू तरी कुठवर सांगे । आयु जात वृथा ।
वार साहिता विसंगते ही । अवघी जीवित गाथा ।।२।।
सद्गुण सुटले स्वधर्म सुटला । स्वैराचार सदा ।
संयम सारा सुटला तोलही । प्रकृती बलवन्ता ।।३।।
जगत संगती केली तिथले । अनुभवले स्वार्था ।
अनादीचा गडी पटली खुण ही । तूच खरा सांगाता ।।४।।
प्रस्तावा ये स्मरता तुजसी । आठवी अपराधा ।
भक्तवत्सल ब्रीद परी तव । पाही भगवन्ता ।।५।।
घडी घडी जपतो नाम तुझे हे । दयाकरी आता ।
अंत न पाही त्वरित सोडवी । नुरवि विषय सत्ता ।।६।।
देव दयाळ गुरू गोविन्दा । गौरवू किती गुणवन्ता ।
'मनोहरनाथ' परम पदी न्यावा । रंगवा गुणगाता ।।७।।
..............................................
पतित पावना पुरूषोत्तम हरी । राम हरे जयकृष्ण मुऱ्हारी ।।धृ.।।
रामकृष्ण हे ध्यान निरंतर । पुरुषोत्तम पदी येई सुखकर ।
कठोर मर्यादा जीवनभर । सत्य व्रतासी गड्या आचरी ।।१।।
पांडव द्रौपदी दुःखी दुर्धर । तारित त्या पुरूषोत्तम यदुवर ।
अधिक मासी या महती अधिक तर । साधी समया सार्थका करी ।।२।।
पुरूषार्थी प्रभुकृपे पात्र तो । काळावरी जो विजय पावतो ।
तो पुरुषोत्तम पदास लभतो । भय भवभ्रान्ती देव निवारी ।।३।।
जय गोविन्दा देव दयाळा । धाव पाव ये परम कृपाळा ।
भक्ती प्रीती दे नित्य जिव्हाळा । 'मनोहरनाथ' गुणगात वैखरी ।।४।।
..............................................
मूक वदे वेदवाणी कृपेने पंगू लंघी शिखरा ।
गोविन्दाच्युत वामन माधव धन्य कृपा सागरा ।।धृ.।।
ब्रह्म सनातन अगाध करणी । निजपद देसी नामस्मरणी ।
पातक दुर्जन मेळा निवटुनी । देसी अभयवरा ।।१।।
प्रल्हादास्तव स्तंभी प्रगटला । हिरण्यकश्यपू दैत्य मर्दिला ।
बालक उपमन्यू तोषविला । देऊनी क्षीरसागरा ।।२।।
धृव बाळाचे हाके सरशी । त्वरे धावला तू हृषीकेशी ।
भक्तिप्रेमे अढळी नेशी । सदय हृदय श्रीधरा ।।३।।
पापी अजामिळ कधी नाठवी हरी । सुत स्मरणी त्या तारिसी भवपुरी ।
गजेन्द्र गणिका प्रेमे उद्धरी । घेऊनिया कैवारा ।।४।।
विहिता विहित विचार न मजला । आर्तभाव कधी जीवा न शिवला ।
'मनोहरनाथ' गोविन्दी फुलविला । भक्ति मोहोर बहरा ।।५।।
..............................................
राधा प्रिय हरी मुकुन्द मोहन, कधी दर्शन देणार ।
गोविन्द राम गोपाळा कृष्णा, कीव कधी घेणार ।।धृ.।।
शरणागत जे तवपदी येती, क्षमा तया करिसी ।
शरण चरणी तव म्हणून दयाळा, ऐकून कीर्तीसी ।
घे गती घे गरूडवाहना, तुजवरी माझा भार ।।१।।
द्रौपदीचे माधव भावा, किती करू धावा ।
गजेन्द्राचे संकट हरणा, विसरी न मज देवा ।
सुदाममित्रा दयाघना कधी, संगत सुख देणार ।।२।।
भक्तवसला ब्रिदाभिमानी, गोविन्द देव दयाळ ।
तू धनी माझा म्हणुन हाकारी, दया करी जगपाल ।
'मनोहरनाथ' अभयशांती दे, म्हणविसी परम उदार ।।३।।