परम पूजनीय श्रीमनोहरनाथ महाराज व्यक्तीदर्शन
।। ज्ञानमय सगुण ते रुपडे ।
एकनाथी परंपरेतील सुर्जी अंजनगाव येथील श्रीदेवनाथ मठाचे आठवे पिठाधीश प.पू. श्रीमनोहरनाथ महाराज म्हणजेच श्रीगुरुजी.
श्रीगुरुजींचे चालते बोलते जीवनच एक मोठे तत्त्वज्ञान होते. प्रेम त्याचा पाया होता.
गुरुजी म्हणायचे, "कळ लागल्याशिवाय कळत नाही अन् कळले असे वाटले तरी ते पोकळ असते."
गुरुजींचे जीवन प्रेमाचे संगीत होते, जीवनात विसंगती असणा-यांना ते ऎकता आले नाही.
शरणागती त्यांचे ऎश्वर्य होते, नम्रता त्याचा आधार होता.
सामर्थ्य त्यांचा स्वभाव होता, आत्मसाक्षात्कार त्याचे कारण होते.
गुरुजी वेगात असले...., तरी असे वाटायचे की कुठेतरी कायमचे थांबले आहेत...., आवेगात नसायचे.
गुरुजींचा वेष उत्तम असायचा..., अंत:करणात सद्गगुरु श्रीगोविंदनाथ कायम विराजमान असल्याने....आवेश कधीच नसायचा
काम नाही काम नाही, झालो पाही रिकामा....ही अवस्था,
तरी सतत कामात असायचे...., अर्थातच लोककल्याणाची व्यवस्था.
अक्षरश: हजारो जिवांसाठी त्यांनी रक्त आटवले पण तसा उल्लेख कोणी केला तर ते त्यांना आवडत नसे.
"अरे तो माझा आहे, त्याचे काम केले तर ते काय बोलायचे असते का ?"
पाणावलेल्या डोळ्यांनी समोरच्या व्यक्तीला असे विचारत ते निरुत्तर करीत.
गुरुजींचे जीवन म्हणजे गीता.
त्याग त्यांची वृत्ती, निष्काम कर्म हे त्यांचे व्रत.
अकृत्रिम निरपेक्ष प्रेम करणे हा त्यांचा आचार धर्म, म्हणून त्यांना कधी प्रचाराची गरज भासली नाही. त्यांचा आचारच त्यांचा प्रचार होता.
गुरुजी हसतमुख असायचे, प्रसन्नतेचा प्रसाद वाटत.
गंभीर नसायचे पण खंबीर असायचे, पाठराखण करतांना.
गुरुजी ऒंकारस्वरुप होते. निराकार संवेदना त्यांचे अधिष्ठान असले तरी भक्तांसाठी ते सगुण साकार सुंदर मनोहर शरीरधारी योगिराज म्हणून प्रगट झाले होते.
गुरुजी निरासक्त होते पण रुक्ष नव्हते, रसिक होते. त्यांना सर्व कला अवगत होत्या. हार्मोनियम वाजवणे. प्रसंगी तानपु-यावर बसून देवाला गोड स्वरात आळवणे.
जिव्हेवर श्रीशारदेचा वास आणि श्रीगणेशाचा प्रज्ञानिवास असे दैवी जीवन व त्यातून निर्माण होणारी अलौकिकाची निर्मीती म्हणजेच त्यांचे वाङमय, कीर्तन, प्रवचन, संगीत, शिल्प, चित्र. कीर्तनात, डोळ्याचे पारणे फिटेल असे दैवी भावावेषात सुंदर नृत्य करणारे गुरुजी
मजुरांसोबत बांधकामपण तेवढ्याच ऎटीत करायचे. उत्तम स्वयंपाक करुन भक्तांना जेवू घालणारे गुरुजी
प्रसंगी स्वत: कार चालवायचे. ह्या सर्व अलौकिकाचा अनुभव घेतांना भक्तांना कौतुक न वाटले तर नवलच.!
श्रीगुरुजींची माणसांना हाताळण्याची कला काही औरच होती. एकदा भेटलेल्या माणसाला ते कधीही विसरत नसत.
देहाला शिस्तीचे वळण लावणारे गुरुजी मनामध्ये प्रेमभाव ऒतप्रोत भरीत भक्तांवर प्रेमाचा अखंड वर्षाव करीत असत.
कायद्याचे उच्च शिक्षण घेतलेले गुरुजी नागपूर युनिव्हर्सिटीचे कलरहोल्डरपण होते. त्यांना सर्व खेळ चांगले खेळता यायचे.
"प्रपंच म्हणजे एक खेळच आहे पण त्याचा खेळखंडोबा करु नका," असे ते सांगायचे.
खेळ खेळतांना जसे विरुद्ध बाजूने कोणीतरी प्रतिस्पर्धी असणारच. त्याचप्रमाणे प्रपंचाचा खेळ खेळतांना
आपणाला अनुकूल असणा-यांना सोबत घेऊन प्रतिकूल प्रवाहाला कलात्मक पद्धतीने तोंड द्यायचे असते, असे ते सांगत.
गुरुजी संसारी असून निर्लेप होते... परमसंन्यासी होते.
गुरुजी सशक्त होते पण राकट नव्हते,
गुरुजी संत होते पण संथ नव्हते,
चपळ होते पण चंचल नव्हते.
स्थीर असून चैतन्यमय होते.
तेजस्वी होते पण उग्र नव्हते.
गुरुजी सहज होते, पण सोपे नव्हते.
कळायला कठीण पण कोमल होते.

एका विदुषीने आपली वाणी संस्कृतला विकली होती. गुरुजींनी तिच्याशी संस्कृतमध्ये संवाद साधला
पण गुरुजींनी आपली वाणी श्रीगोविंदनाथांना अर्पण केली होती कारण,
"ते भेटले आणि माझी बोलती बंद झाली", असे गुरुजी स्वत: सांगत.
गुरुजी निष्काम अंत:करणाने देवकार्यात सक्रीय असणारे अलौकिक सिद्धपुरुष होते.
आम्ही मात्र सकाम अंत:करणाने प्रापंचिक कार्यातपण निष्क्रीय आहोत.

गुरुजी लहान होऊन जगले व लहान व्हायला सांगायचे. पण
गुरुजींचा आत्मिक विस्तार एवढा मोठा आहे की जग त्यांच्यात सामावले आहे. फक्त तेच एकटे आहेत सर्व चराचरात.
आम्हाला एकटेपणाची भिती आहे म्हणून आम्ही मायीक विस्तार इतका केला की
खूप विविध आधार घेऊनही एकाकी पडलो आहोत, अपूर्ण होऊन.
अशी अपूर्णता सोबत ठेवून पूर्णपुरुषाबद्दल काय व्यक्त करावे ?
एवढेच म्हणता येईल,
रवि, शशी, अग्नी, नेणती ज्या रुपा
स्व:प्रकाश रुपा नेणे वेद
ऒंकारस्वरुपा सदगुरु समर्था अनाथांच्या नाथा
तूज नमो, तूज नमो, तूज नमो.....